Spread the love

पिंपरी : हिंजवडी आयटी हब आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा प्रमुख दुवा वाकड-दत्तमंदिर रस्ता विकास आराखड्याप्रमाणे ४५ मीटर रुंदीचाच होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड फेडरेशनचे पदाधिकारी आणि आयुक्त शेखर सिंह व इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी (दि. १७) त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा रस्ता ४५ मीटर रुंदीचा करण्यासाठी अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेण्याचे आश्वासन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या बैठकीत दिले.

वाकड-दत्त मंदिर हा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात ४५ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार हा रस्ता होणे अपेक्षित आहे. मात्र महापालिकेने ४५ मीटरऐवजी ३० मीटर रुंदीचाच रस्ता करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाकड भागातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यामध्ये राहणाऱ्या लाखो नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विकास आराखड्यानुसार रस्ता होत नसल्याने या नागरिकांना दररोज वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. ज्या बिल्डरांनी व जागा मालकांनी जागेचा मोबदला घेतला आहे, त्याचा ताबा महापालिका प्रशासनाने घ्यावा. ज्यामुळे रस्त्याच्या कामाला गती येईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन हा रस्ता ४५ मीटरचा करण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेत पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे आणि इतर प्रतिनिधी यांच्यासोबत महापालिका आयुक्त शेखर सिंह व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिका भवनात घेतली. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते.

वाकड-दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाबाबत स्थानिक सोसायटीधारकांनी आक्षेप घेतले आहेत. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ४५ मीटर होणे अपेक्षीत आहे. महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये असलेल्या वाकड- दत्तमंदिर रोडचे रुंदीकरण विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे होत नाही. काही ठिकाणी अनिकृत बांधकामे आहेत. त्याला प्रशासनाकडून अभय देण्यात येत असून, त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अगदी ३० मीटरपर्यंतच ठेवण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे विकास आराखड्यात मंजूर असलेल्या नियोजनाप्रमाणे या रस्त्याचे काम करावे, अशी परिसरातील सोसायटीधारकांची मागणी असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना सांगितले. सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही आयुक्तांपुढे सविस्तर म्हणणे मांडले.

त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी हा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे ४५ मीटर रस्ता करण्याबाबत प्रशासन कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट केले. काही ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. ती काही दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे. त्यामुळे हा रस्ता ४५ मीटरचाच होणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

वाकड- दत्त मंदिर रोड परिसरातील स्थानिक सोसायटीधारकांनी दत्त मंदिर रोड रुंदीकरणाबाबत नोंदवलेले आक्षेप रास्त आहेत. विकास आराखड्याप्रमाणे प्रशासनाने ४५ मीटर रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करुन द्यावा. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे कामाची पाहणी करावी. अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली.

– सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाबाबत स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत वारंवार चर्चा झाली आहे. त्यामुळे सोसायटीधारकांसोबत आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये विकास आराखड्याची अंमलबजावणी करुन रस्ता रुंदीकरण करावे. या मार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली. याला आयुक्त शेखर सिंह व संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *