Spread the love

पायाभूत सोयी-सुविधा होणार सक्षम; भाजपा आमदार महेश लांडगेयांचा विश्वास

पिंपरी । प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीच्या मधोमन वसलेले टाळगाव चिखली गावाला आता ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

मौजे टाळगाव चिखलीला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात दि. १९ मे २०२३ रोजी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्राद्वारे कळवले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन झाले. त्यावेळी त्यांचे टाळ चिखली येथे पडले होते’’ त्यामुळे गावाला टाळगाव चिखली असे नाव पडले, अशी सांगितली जाते. त्या घटनेचे साक्षीदार असलेले टाळ मंदिर आजही गावात आहे. तसेच महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी चिखली गावातील होते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या गावाला चोहोबाजूने तटबंदी होती. ग्वाल्हेरचे देवराम कृष्णराव जाधवराव यांची गढी आहे. त्यामुळे गावाला धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. तसेच, गावातील श्री. भैरवनाथ हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीमध्ये परिचित आहे.

संतपीठामुळे महाराष्ट्रभरात ख्याती…

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात आले आहे. चिखलीगाव, जाधववाडी, कुदळवाडी, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, पवार वस्ती, हरगुडेवस्ती या संपूर्ण भागाचा गावात समावेश आहे. १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत गावाचा समावेश झाला असून, २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टी च्या सत्ताकाळात चिखली आणि परिसरात प्रलंबित विकासकामांना गती देण्यात आली आहे. आता ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा मिळाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा आणखी सक्षम करण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.

 

 

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *