पुणे-लोणावळा लोकल धावली; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार श्रीरंग बारणे यांनी दाखविला हिरवा झेंडा
पिंपरी : प्रतिनिधी
कोरोना महामारीनंतर दुपारच्या वेळेत बंद झालेली पुणे-लोणावळा लोकल अखेर बुधवारपासून पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखविला. लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त करत खासदार बारणे यांचे आभार मानले.
लोणावळा रेल्वे स्थानक येथे उद्घाटन सोहळा झाला. राज्यमंत्री दानवे आणि खासदार बारणे दिल्लीतून सहभागी झाले होते. मंडल रेल प्रबंधक इंदू दुबे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी स्थानकावर उपस्थित होते.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केल्या. पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल गाड्यांचे संचालन करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे हे सातत्याने पाठपुरावा करत होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, माझ्याकडे आणि अधिकाऱ्यांकडे त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. आजपासून दुपारच्या वेळेत लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे.
कोणार्क एक्स्प्रेसला लोणावळा-कर्जतला थांबा
पुणे-लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या सोयीनुसार लोकलच्या दुपारच्या वेळा निश्चित केल्या जातील. कोणार्क एक्स्प्रेसला लोणावळा-कर्जत स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. त्याचबरोबर आणखी लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मावळ मतदारसंघात विविध पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे मावळात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत समावेश झाला आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या रेल्वे स्थानकाचा विस्तार, सुशोभीकरण होत असून काम प्रगतीपथावर असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.