चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ; कंपनी व्यवस्थापन- स्वाभिमानी कामगार संघटनेचा करार
पिंपरी । प्रतिनिधी
चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करीत डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. कंपनीने कामगारांसाठी तब्बल १८ हजार ५०० रुपयांची पगारवाढ केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चाकण- भांबोली येथील डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार करण्यात आला. करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, महादेव येळवंडे, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष कमलेश भोकसे, उपाध्यक्ष धनेश निघोजकर, सरचिटणीस पांडुरंग मराठे, खजिनदार बाबासाहेब दरेकर यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
तसेच, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट कमल वाधवा, सी.ओ.ओ. मनोज गर्ग, धरणी सतिशकुमार, एच आर हेड रणपाल सिंह, एच. आर. मॅनेजर ओंकार चव्हाण, यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.
करारानुसार कामगारांना मिळालेले लाभ…
एकूण पगारवाढ :- १८५००/- ( आठरा हजार पाचशे रुपये), पगाराचा रेशो:- पहिल्या वर्षी ६०% दुसऱ्या वर्षी २०% तिसऱ्या वर्षी २०% मिळणार. कराराचा कालावधी तीन वर्षांचा राहील. मेडिक्लेम पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, पगारी सुट्टी, मतदानाची सुट्टी, दुखवटा सुट्टी, पितृत्व रजा, दिवाळी बोनस: सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा १५०००/- देण्यात येईल., दिवाळी दसरा भेटवस्तू, सेवा कायम करणे:- कंत्राटी कामगारांमधून ३४ कामगार कायम करण्याचा निर्णय मान्य झाला आहे, मासिक हजेरी, व सेवा बक्षीस, कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस योजना, वैयक्तिक कर्ज सुविधा, बस सुविधा किंवा कंपनी पॉलिसी प्रमाणे कार सुविधा, कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा कोविड सारखी परिस्थिती उद्भवल्यास व्यवस्थापन पूर्ण वेतन देण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ७ महिन्याचा फरक पगारामध्ये देण्यात येणार आहे, असे भरघोस लाभ कामगारांना मिळणार आहेत.