पिंपरी : प्रतिनिधी
चेहऱ्यावर नम्रता व विनम्रपणे बोलणारा माणूस अशी ओळख महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची आहे. मावळ लोकसभेत येत्या १३ मेला मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरे पाटील यांच्यासारखा चांगला माणूस निवडून देवू. संघर्षाच्या काळात आणि अघोषित आणीबाणीच्या विरोधात ही मोठी लढाई आहे. अधिका-यांचा गैरवापर करून पक्ष फोडले, नेते फोडले. तरी सामान्य कार्यकर्ता इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी विचार दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आज, रविवारी केले.
मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. ७ एप्रिल) रहाटणीत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार शहराध्यक्ष तुषार कामठे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला शहराध्यक्षा ज्योति निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, काँग्रेस पदाधिकारी गौतम अरगडे, महिला शहराध्यक्ष सायली नढे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, मीनल यादव, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष मीना जावळे, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, माजी उपमहापौर दत्ता वाघेरे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बी. डी. यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, सतीश काळे, युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत घुले, शहरप्रमुख चेतन पवार, भरत नायडू, आशिष ठोंबरे, काशिनाथ नखाते, अनिता तुतारे, गणेश दराडे, काशिनाथ जगताप, यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह सर्व पक्ष, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, “मराठा, ओबीसी, धनगर समाजाला खेळवत ठेवण्याचे काम सरकारने केले. तरुणांची फसवणूक सरकारने केली. म्हणूनच ८४ वर्षाच्या योध्द्याला तरुण साथ देतात. ही लढाई सोपी नाही. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला निर्णय हा ख-या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे लढणारा विचार आहे. ७ तारखेला मी मोकळा झाल्यानंतर मावळमध्ये संजोग वाघेरे मी तुमच्याबरोबर आहे. एका विचाराचे कार्यकर्ते म्हणून हा माणूस निवडून आला पाहिजे, हा संकल्प घेऊन इथून बाहेर जावू”.
देशात एकच झेंडा, एकच नेता हे सूत्र आपल्याला चालणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करत सचिन अहिर म्हणाले की, समोरच्यांकडे काही मुद्दे राहिले नाहीत. भ्रष्टाचारावर बोलतात. तेच आठवड्यात पुन्हा त्यांच्या पक्षात घेतले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते फोडण्याचे काम केले. आता बंद झालेला भोंगा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना-भाजपच्या युतीत बिघाडी कोणी केली, हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. भाजपमध्ये संस्कृती राहिली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दोन दोन पक्ष फोडावे लागले, हे सांगावे लागते. हे त्यांचे दुर्दैव आहे. पण, तरी दुसऱ्या बाजूला निष्ठा असून कार्यकर्ता आणि मतदार एकवटलेला आहे. सर्वांमध्ये चीड आहे. रामाचे नाव घेऊन त्यांना यावेळी राम पावणार नाहीत. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्या प्रमाणे मुखात राम, हाताला काम, समाजाला सन्मान ही भूमिका घेऊन विजयासाठी कामाला लागू, असे अहिर म्हणाले. तसेच, कोविडमध्ये आपले नेते कुठे होते, असं विचारणारे खासदार तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ते देशातनंबर एकचे मुख्यमंत्री असल्याचे सांगत कौतुक करत होते. मात्र, तळेगावचा उद्योग पळवत असताना इथले खासदार काय करत होते, हे आता त्यांना विचारले पाहिजे.
तुषार कामठे म्हणाले, “भाजप चुकीच्या प्रचारात गुंतवून ठेवत आहे. भाजप देशात दोनशे पार जाणार नाही. सुप्रियाताई सुळे, अमोलजी कोल्हे यांच्यासोबत मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवू, हा निश्चय प्रत्येक कार्यकर्त्याने केलेला आहे. पवार साहेब व उद्धव साहेब यांच्यासोबत लढायला आम्ही तयार आहोत. स्वाभिमानी जनता आणि कार्यकर्ता गद्दार व धोका देणा-यांना आता बळ देणार नाही”.
मानव कांबळे म्हणाले, “प्रत्येक कार्यकर्त्याला मतदारांपर्यंत पोहोचायचे. संविधान वाचविण्यासाठी, महिला, तरुण, गरिबांच्या, शेतकऱ्यांसाठी संजोग वाघेरे म्हणजे आपण स्वतः उमेदवार आहोत. हे समजून ही लढाई लढायची असून संजोग वाघेरेंना निवडून देण्याचे काम करावे लागेल”.
चेतन बेंद्रे म्हणाले, “मोदी सरकारच्या दहा वर्षांत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. नोटबंदी, कोविड केअर फंड आणि इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे घोटाळे केले. भ्रष्टाचा-यांना जेलमध्ये टाकायचे सांगून त्यांना भाजपमध्ये घेतले. भाजपचे निष्ठावंत भाजपचे काम करणार नाहीत. महाविकास आघाडीत निष्ठावंत मावळे आपल्या सोबतीला आहे”.
मेळाव्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते निवडणूक प्रचारपत्रकाचे प्रकाशन, तसेच एलईडी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक शिवसेना शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केले. सुनिल गव्हाणे, गौतम अरगडे, बी. डी यादव, प्रवीण कदम यांनी मनोगत व्यक्त करत मावळ लोकसभेत संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.
पक्षापुरती नव्हे, तर अस्तित्वाची आणि लोकशाहीची लढाई : सचिन अहिर
संजोग वाघेरे संघर्षाच्या वेळी उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी उभे राहिले. पक्षाचा इतिहास लिहिताना याची आठवण होईल. परंतु, देशात पक्षापुरती ही लढाई राहिलेली नाही. अस्तित्वाची आणि लोकशाहीची लढाई आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मिळून आपल्याला जिंकायची आहे. अनेक जुमले निवडणुकीत दिले जातील. कार्यकर्ता, मतदार आणि सर्व घटक पक्षांच्या मदतीने संजोग वाघेरे पाटील निवडून येतील. संघटनात्मक, वैचारिकदृष्ट्या ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे या सगळ्याला चोख उत्तर मतदानातून द्या, असे सचिन अहिर म्हणाले.
पेटती मशाल हातात घेऊन ४ तारखेला विजयाची तुतारी वाजवू : संजोग वाघेरे पाटील
उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी पुतळ्याचे भूमिपूजन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले. पण, काहीही पूर्ण केले नाही महाराष्ट्रात आलेले आणि येणारे उद्योग गुजरातला पळविले. रेल्वेच्या फे-या वाढल्या नाहीत. चौपदरीकरण झाले नाही. मावळ मतदारसंघात पर्यटनासाठी वाव असताना काही काम झाले नाही. आता लोक जाब विचारत आहेत. आपण त्यांच्या गुगलनितीच्या चर्चेत अडकायचे नाही. सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. तो गद्दारांना गाडायचे, असं म्हणत आहेत. धनशक्ती विरूद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे चिंचवडमधून अडीच लाख आणि पूर्ण मावळ मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे. १३ मेपर्यंत पेटती मशाल हातात घेऊन ४ तारखेला विजयाची तुतारी वाजविण्याचा निर्धार करु”, असे ते म्हणाले.