Spread the love
बारामती : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन निवडणूक सुरळीतपणे पाडणे ही सामुहिक जबाबदारी आहे; सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधत संघभावनेने, समन्वयाने काम करावे,  असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.
बारामती विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचारी यांच्याकरीता माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात निवडणुकीसाठी चांगली तयारी करण्यात आली आहे. निवडणुक विषयक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था, अल्पोहार, भोजन, निवास व्यवस्था आदीबाबत काळजी घ्यावी. आरोग्यविषयक सुविधेकरीता २०० रुग्णालयासोबत करार करण्यात आले आहेत.
प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत काही बदल होत असतात. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन बदल समजून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वेळेला फार महत्व आहे, त्यादृष्टीने कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करावे. या प्रशिक्षणाचा लाभ येत्या निवडणुकीत होणार असल्याने प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करावे. निवडणुक  प्रक्रियेत सहकारी तसेच मतदारांसोबत चांगला संवाद ठेवा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
 दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण २ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी विविध पैलूंची श्री. नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *