Spread the love

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र ओझर विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी आज राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आणि केंद्र व राज्यातील महायुतीची विकासात्मक धोरणाला जनसामान्यांतून प्रतिसाद मिळत आहे.

 

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या समन्वयाने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश कवडे यांनी हातात ‘कमळ’ घेतले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची शिरुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कवडे यांनी भाजपाची पताका खांद्यावर घेतली.

 

याबाबत आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा ‘‘श्रीगणेशा’’ निश्चितपणे महायुतीचे उमेदवारशिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शुभसंकेत ठरेल, असा विश्वास वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गणेश कवडे काम करीत होते. जुन्नर तालुक्यातील युवा चेहरा आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. तसेच, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महायुतीच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर लढत आहेत. मात्र, ‘‘घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत…’’ असा नारा देत भाजपा आढळरावांच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘कट्टर समर्थक’ असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. त्याद्वारे भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. अष्टविनायक गणपतीपैकी ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि रांजनगावचा महागणपती ही तीर्थक्षेत्र शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आहेत. पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा महायुतीला होईल, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *