पिंपरी : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते मशाल पेटवून या मशाल यात्रेची सुरुवात रहाटणीतून करण्यात आली. रहाटणी परिसरानंतर काळेवाडी, अमरदीप कॉलनी, पिंपरी बाराजपेठ, डीलक्स चौक, पिंपरीगाव, पिंपरी सौदागर यासह विविध भागातून मशाल यात्रा काढून प्रचार करण्यात आला. या मशाल यात्रेत “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष करीत हातात मशाली घेऊन युवा सैनिांनी मावळ लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी फक्त मशाल हेच चिन्ह लक्षात ठेवण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने शहरात “मशाल यात्रा” काढण्यात आली. युवासेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत हाती मशाल घेऊन असंख्य युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले.
वरुण सरदेसाई यांच्यासोबत या यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड . सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी चेतन पवार, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, गुलाब गरुड, दस्तगीर मणियार यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनेचे पदाधिकारी, युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.
या यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांना गाडण्याचा संदेश दिला आहे. तो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. गद्दारी करणा-यांना आणि उध्दव ठाकरे यांना त्रास देणा-यांना या निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे. मतदारसंघात मशाल पेटवून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करायचे आहे. त्यासाठी 13 मे पर्यंत कोणीही गाफील राहू नका, असे आवाहन वरुण सरदेसाई यांनी युवासैनिकांना केले.