मुंबई : प्रतिनिधी
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही भ्रष्टाचार हटविण्याचा संकल्प करतो, तेव्हा इंडी आघाडीचे लोक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढतात. येत्या पाच वर्षात अशा सर्व भ्रष्ट लोकांवर वेगाने कडक कारवाई केली जाईल, आणि भ्रष्टाचार खणून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झारखंडमधील पलामू आणि लोहरदगा येथे आयोजित केलेल्या विशाल जाहीर विजय संकल्प सभांमध्ये बोलताना दिली.
झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाबूलाल मरांडी, झारखंडचे विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नेते अमर कुमार बाउरी, विद्यमान खासदार व पलामूचे उमेदवार विष्णू दयाल राम, राज्यसभा खासदार सुदर्शन भगत, लोहरदगा उमेदवार व भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. समीर उरांव, आजसू पक्षाचे अध्यक्ष सुदेश महतो आणि इतर नेते यावेळी मंचावर उपस्थित होते.
आपल्या तडाखेबंद भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि इंडी आघाडीवर जोरदार शरसंधान केले. इंडी आघाडीचे नेते जनहित आणि विकासाच्या मागणीसाठी नव्हे तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी रॅली काढतात, असे सांगून ते म्हणाले की, काँग्रेसने गेल्या 60 वर्षांत केवळ घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण केले आहे. काँग्रेसच्या डावपेचांनी देशाला नक्षलवाद आणि माओवादाच्या रक्तरंजित हिंसेचा तडाखा दिला, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर देशाचा मोठा भाग माओवाद्यांच्या हिंसेतून मुक्त केला. आपली मते वाचवण्यासाठी काँग्रेस दहशतवाद्यांवर कारवाईही करत नाही, असा आरोपही श्री. मोदी यांनी केला. घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचा आणि आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा घातक खेळ झारखंडमध्ये सुरू आहे. पीएफआयसारख्या बंदी घातलेल्या संघटना संथालमध्ये त्यांचे रॅकेट चालवत आहेत आणि आदिवासी महिलांवर अत्याचार करत आहेत. जेव्हा लोक या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा इंडी आघाडी व्होट जिहादचे आवाहन करू लागते. काँग्रेसने कितीही जिहाद केले तरी हा देश मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. झामुमो-काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अमाप संपत्ती गोळा केली आहे. मालमत्ता असो, राजकारण असो, ते आपल्या मुलांसाठी सर्व काही कमवत असतात. त्यांचा वारसा म्हणून ते बराच काळा पैसा मागे ठेऊन जातील, असा गंभीर आरोप याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी केला.
आज पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्याची प्रार्थना करत आहेत, पण सशक्त भारताला आता मजबूत सरकार हवे आहे आणि मजबूत सरकारसाठी मोदी सरकार हवे, ही देशाच्या जनतेची भावना आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशवासियांची सेवा करत असून गेल्या 25 वर्षांत माझ्यावर एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप झालेला नाही. आजही मी पद, प्रतिष्ठा, सुख-समृद्धी यापासून दूर आहे, आणि हीच माझी ताकद आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्यास इंडी आघाडीने कडाडून विरोध केला होता. काँग्रेसच्या काळात रेशन सडत राहिले. आदिवासी भागातील मुले उपाशी मरत राहिली आणि काँग्रेसने धान्य गोदामांना टाळे ठोकले. आम्ही सर्व धान्य गोदामांचे कुलूप उघडले, आज देशात मोफत रेशनची योजना सुरू आहे. पुढील पाच वर्षे ही योजना चालू राहील याची मी हमी दिली आहे. झारखंडमध्ये रोज पेपरफुटीच्या घटना घडत असत आणि तरुणांच्या भवितव्याशी खेळले जायचे, पण आज केंद्रातील भाजपा सरकारने पेपरफुटी विरोधात कडक कायदा केला आहे.
देशातील जनतेला कधीही संकटांनी भरलेले जीवन जगावे लागू नये यासाठी मी विकसित भारताचा वारसा देणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मी गरिबीत जगलो आहे आणि गरिबांच्या अडचणीतून गेलो आहे. म्हणूनच माझ्या 10 वर्षांच्या गरीब कल्याण योजना माझ्या जीवनातील अनुभवातून जन्माला आल्या आहेत. आज लाभार्थींना भेटल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू तरळले असून या अश्रूंची किंमत फक्त गरिबीत जगलेली व्यक्तीच समजू शकते. ज्याने आपल्या आईला पोट बांधून झोपताना आणि शौचालया अभावी वेदना आणि अपमान सहन करताना पाहिले नाही, त्याला मोदींच्या या अश्रूंचा अर्थ समजू शकत नाही, असे सांगताना पंतप्रधान काहीसे भावुक झाले. पण काँग्रेसच्या राजपुत्रांना मोदींच्या अश्रूंमध्ये आपला आनंद दिसतोय आणि हे निराश आणि हताश झालेले लोक इतके उदास झाले आहेत की त्यांना मोदींचे अश्रू आवडू लागले आहेत. “जाके पाँव फटे न फटे बिवाई, सो क्या जाने पीर पराई” या उक्तीतून काँग्रेसच्या राजपुत्राची अवस्था सांगितली जाते. राहुल गांधी चांदीच्या चमच्याने जेवण करत राहिले, गरिबांच्या झोपडीत फोटो काढत राहिले पण गरिबांसाठी त्यांनी कधी काही केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. आमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर आले आहेत, त्यामुळेच देशातील गरीब जनता मोदींना आशीर्वाद देत असून हे आशीर्वाद मोदींची शक्ती आणि भांडवल आहेत, असेही ते म्हणाले.
मोदींना देशात रोजगार वाढवायचा आहे, लोकांच्या जीवनात समृद्धी आणायची आहे परंतु काँग्रेसचा डोळा सार्वजनिक मालमत्तेवर आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सार्वजनिक मालमत्तेचे एक्स-रे काढणे, त्यातील काही भाग जप्त करणे आणि ते आपल्या व्होट बँकांमध्ये वाटण्याची गोष्ट केली आहे. पण हे जनतेला अजिबात मान्य नाही. काँग्रेस आणि इंडी आघाडीने आणखी एक धोकादायक गोष्ट सांगितली आहे. भाजपाचा विजय झाला तर आरक्षण आणि राज्यघटना संपुष्टात येईल, असे खोटे काँग्रेस जनतेमध्ये पसरवत आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून देशात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे आणि भाजपाने आजपर्यंत असे कोणतेही पाऊल उचलले नाही, याकडेही त्यांनी देशाचे लक्ष वेधले. उलट भाजपाने इंडी आघाडी व काँग्रेसचे सत्य उघड केले असून त्यांनाच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, असा आरोपही श्री. मोदी यांनी केला. देशात धर्माच्या आधारावर आरक्षण कधीही दिले जाणार नाही, असे संविधानकर्त्यांनी ठरविले होते, पण काँग्रेस-झामुमो आणि राजदसह संपूर्ण इंडी आघाडी आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षणावर दरोडा घालत असून विशिष्ट वर्गाला धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा त्यांचा इरादा आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या या घोषणेला राजद आणि झामुमोची स्पष्ट संमती असली तरी मोदी जिवंत असेपर्यंत दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही, संविधानाशी छेडछाड करू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.