पिंपरी : प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघासह संपूर्ण शहरातील सोसायट्यामध्ये निर्माण होणारा ओला कचरा सोमवारपासून (दि. 15) उचलणार नाही, अशा प्रकारचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती समजते. यासंदर्भात चिंचवड विधानसभा मतदार संघातील बहुतांश सोसायट्यांना नोटिसा ही बजावण्यात आल्या आहेत. वेळेत कर भरणा-या सोसायटीमधील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. सोसायटीमधील ओला कचरा हा महापालिकेनेच उचलला पाहिजे. सोसायट्यांना आजपर्यंत वाटप केलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा आपल्या विरोधात जन आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते यांनी आयुक्तांना दिला आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये चंद्रकांत (आण्णा) नखाते यांनी म्हटले आहे की, शहरातील सोसायटीमध्ये निर्माण होणारा ओला कचरा महानगरपालिकेमार्फत आजपासून (सोमवार, 15 जुलै) उचलला जाणार नसल्याची माहिती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या माध्यमातून समजली. सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅटधारक महानगरपालिकेला नियमित मिळकत कर भरतो. पाणी पट्टी, कचरा शूल्क, रोड टॅक्स आदी सर्व प्रकारचे कर वेळेत जमा करतो. तरी, सोसायटी धारकांचा ओला कचरा उचलण्यास महानगरपालिकेकडून नकार दिला जात आहे. आरोग्य विभागाकडून सोसायटीमधील रहिवाशांना अशा नोटिसा पाठविल्या जात आहेत. महानगरपालिकेकडून घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत गैरसोयीचा आणि अवेळी घेण्यात आलेला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची अंमलबजावणी करणे नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार नाही. चिंचवड विधानसभेत छोट्या सोसायट्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याठिकाणी निर्माण होणारा ओला कचरा जिरवण्यासाठी जागेची मर्यादा येत आहे. अशा सोसायट्यांना शक्य असल्यास महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. तरच, त्याठिकाणी ओला कचरा जिरवण्याची व्यवस्था होऊ शकेल. जागेअभावी ओला कचरा सोसायटी परिसरात जिरवणे छोट्या सोसायट्यांना शक्य होणार नाही.
ऐन पावसाळ्यात ओला कचरा सोसायटीमध्ये जीरवणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. हाच ओला कचरा रस्त्याच्या कडेला टाकला गेल्यास परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वैद्यकीय विभागापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोसायटीमधील सुका कचरा बरोबरच ओला कचरा उचलण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. मुळात प्लॅन पास देताना या नियमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मुळात अधिका-यांकडून झालेल्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना का देता ?, ओला कचरा हा महानगरपालिकेमार्फत उचलण्यात यावा. तसेच, सोसायटीतील नागरिकांना वाटप करण्यात येणा-या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात, अन्यथा आपल्या विरोधात जन आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा क्रीडा समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक चंद्रकांत (आण्णा नखाते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.