महाविकास आघाडीची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी प्रमुख घटक पक्षांची बैठक आज मुंबई येथे पार पडली. यावेळी येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महिला, बालकांविरोधात होत असलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. राज्यातील गृह खात्याचे हे सपशेल अपयश आहे. या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील.
बदलापूरच्या घटनेत गृहखात्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली. शाळा संस्थेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच बदलापूरकर चिडले आणि रस्त्यावर आले. यात भाजपा आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला.
महाराष्ट्रातील बालकांविरोधी गुन्हे २०१४ साली आठ हजार होते ते आता २२ हजारांपर्यंत गेले आहेत. महिलांवरील अत्याचार २६ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. हे गंभीर आहे. त्यामुळे यात कोणते राजकारण नसून सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही विरोधक म्हणून मांडणार असे त्यांनी सांगितले