पिंपरी : प्रतिनिधी
बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. शहरातील अल्पवयीन मुली आणि एकूणच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत पालिका प्रशासनाने देखील तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी महानगरपालिका सभासद, मा. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सुसंस्कृत समाजात अशा गोष्टी घडणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळा महाविद्यालये यामध्ये शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस यांची समिती स्थापन करावी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी प्रशिक्षण देण्यात यावे, शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात यावी, शिक्षकेतर पुरुष कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हरेफिकेशन करण्यात यावे, दिवसांतुन दोन वेळा शाळा आणि महाविद्यालय आवारात पोलिसांचा राऊंड असावा.
मुलींना त्रास देण्याच्या घटनांची माहिती कळवण्यासाठी शाळेत अलार्म सिस्टीमसह वेगळा टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, बाल लैंगिक अत्याचार, महिला अत्याचार संदर्भातील कायद्याबाबत जनजागृती करावी, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत व शाळेतील सर्व भाग हा कॅमेऱ्याच्या कक्षेत असावा, मुलींना प्रसाधन गृहात ने- आण करण्यासाठी महिला कर्मचारी असावेत, अशी मागणी व सूचना या निवेदनाद्वारे केली आहे.
या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये यामध्ये करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.