पिंपरी चिंचवड : प्रति
राज्याची निवडणूक जाहीर झाल्याने भारतीय जनता पक्ष केंद्रीय समितीने आज महाराष्ट्र विधानसभेसाठी 99 उमेदवाराची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये चिंचवड विधानसभेसाठी पुन्हा एकदा जगताप कुटुंबावरच विश्वास दाखवत पक्षाने दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू व भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. त्याबरोबरच भोसरी विधानसभेसाठी पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार अश्विनीताई जगताप यांनाच उमेदवारी मिळेल असे शहरात चर्चा होत होती. त्याबरोबरच शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक शंकर जगताप यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते. विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे एका पत्राद्वारे शिफारस केली होती. तसेच पिंपरी चिंचवड मधील 65 आजी-माजी नगरसेवकांनी शंकर जगतापांसाठी वरिष्ठांकडे एक मुखी मागणी केली होती.
भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
भोसरी मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार महेश लांडगे व चिंचवड विधानसभेसाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे महायुतीचे उमेदवार असणार आहे. परंतु महाविकास आघाडीकडून यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळतील याकडे पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागून राहिले आहे.