Spread the love

जोरदार शक्ती प्रदर्शन; लोटला जनसमुदाय

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आयोजित जाहीर सभेत मावळातील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी बापूसाहेब भेगडे यांना निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी मावळवासियांना आवाहन केले.

 

मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपस्थित होते.

 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट)चे वरिष्ठ सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपा महिला आघाडीप्रमुख सायलीताई बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. रुपालीताई दाभाडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे म्हणाले, की सध्या मावळ तालुक्यात ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यांना पायबंद घालण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे. सर्व विचार एकत्र करून मावळची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे. ज्या संस्कृती जडणघडणीत मावळ घडला, आज त्याच मावळातील तरुण सैरभैर झाला आहे. या तरुण वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आपण निष्ठेला जागणारा कार्यकर्ता आहे, जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक तरुण मोठ्या पदांवर गेलेले पाहायचे आहे. माझ्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जनतेने संधी दिल्यास तालुक्यातील मुली, महिलांचे पालकत्व स्वीकारणार आहे. शिक्षणाबाबत, अन्यायाबाबत काही तक्रार असेल तर आवाज द्या, आपण सदैव तत्पर असू, असे आश्वासनही बापूसाहेब भेगडे यांनी दिले.

 

भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख यशवंत मोहोळ, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट) मुख्य सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *