Spread the love

राजू राजभर यांच्या कुटुंबाने घेतली पोलिसांची भेट

पिंपरी : प्रतिनिधी

सावकारी कर्जाच्‍या त्रासाला कंटाळून नुकतेच पिंपरीतील रिक्षा चालकाने आत्‍महत्‍या केली. या रिक्षा चालक मृत्‍युप्रकरणी फेर जबाब नोंदवून आरोपींना त्‍वरीत अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

या वेळी राजू राजभर यांच्या कुटुंबासमवेत त्‍यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. तसेच या प्रकरणी फेरजबाब नोंदवून आरोपींना ताबडतोब अटक करावे, अशी मागणी केली आहे. राजू राजभर प्रकरणी संबंधित आरोपींवर योग्य कलमाअंतर्गत कारवाई करून कठोर शासन करावे. त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची मागणी आहे, असे बाबा कांबळे म्‍हणाले. तसेच पुणे जिल्‍हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तांना त्‍यांनी या बाबत निवेदन देऊन मागणी केली. याप्रकरणी योग्य ती दखल न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे. यावेळी समीर बागवान, नरेश कोंनमाने उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, रिक्षा चालक राजू राजभर यांनी दहा टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले होते. वेळेत कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे चक्रवाढ व्याज दराने संबंधित सावकारांनी त्यांच्याकडे कर्जाची रक्‍कम परत देण्याची मागणी केली. सततच्‍या धमक्या आणि मानसिक त्रास चालू असल्‍यामुळे ३ जानेवारीला राजू राजभरे या रिक्षा चालकांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्‍यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला. तसेच चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्‍या एफआयआर मध्ये राजू राजभर यांनी हात उसने पैसे घेतले असा उल्लेख केला आहे. मुळात हे चुकीचे असून राजू राजभर यांनी दहा टक्के व्याजदराने पैसे घेतले होते. हे स्वतः राजू राजभर यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तसेच त्‍यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत देखील हे लिहिले आहे. असे असताना एफआयआरमध्ये मात्र हात उसने पैसे घेतले असा उल्लेख झाल्यामुळे आरोपींना याचा फायदा होत आहे. यामुळे याप्रकरणी फेरजबाब नोंदवावा,अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

मृत्यूच्या वारसदारांना वीस लाख रुपये सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात खाजगी सावकारांचे प्रस्त वाढत आहे. त्‍यांच्‍याकडून सर्वसामान्य रिक्षा चालक, गोरगरीब घटकांचे शोषण होत आहे. या प्रकरणी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील अनेक रिक्षा चालकांनी पोलिसांकडे याप्रकरणी अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे हे प्रकरण वाढत आहे. त्‍याला आळा घालावा, असे बाबा कांबळे म्‍हणाले.

पोलिस आयुक्‍तांनी दखल घ्यावी : बाबा कांबळे

या प्रकरणाची पिंपरी पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त यांना भेटण्याची वेळ मागितली आहे परंतु अजूनही भेटण्याची वेळ मिळाली नाही, असे कांबळे म्‍हणाले. त्‍यामुळे निगडी पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित तपास अधिकारी यांची भेट देऊन त्यांना या प्रकरणी फेरजबाब घेण्याची मागणी केली. आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी योग्य ती दखल न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *