पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात फक्त तीनशे नागरिकांनी आपल्या महानगरपालिकेचा रितसर परवाना घेवुन कुत्री पाळलेली आहेत. मात्र शहरात आज रोजी सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांनी विनापरवाना कुत्री पाळलेली आहेत. त्या विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यांना वेळोवेळी लसीकरण केले जात नाही, अशी कुत्री चावल्यास रेबीज होतो व नाहक नागरिकांचा जीव जातो. त्यामुळे अशा विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी वंचित उत्थान व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन केली आहे.
विनापरवाना घरे बांधणारे, विनापरवाना नळ कनेक्शन जोडणारे यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. तोच नियम या विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांना लावुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीत नागरिकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, तरी ही घरात कुत्री पाळली जातात व घरात पुरेशी जागा नसल्याने ती कुत्री रस्त्यांवर सोडली जातात. तसेच त्याची योग्य निगा राखली जात नाही कि त्यांना वेळेवर लसीकरण केले जात नाही. हिच परिस्थिती चाळीत व घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीत आहे. राहायला जागा कमी असतांना तिथे कुत्री पाळली जातात, त्यांच्या गळयात पट्टा बांधला जात नाही. घरात जागा नसल्यानी त्यांना बाहेर रस्त्यावर मोकळे सोडले जाते मग त्या कुत्र्यांच्या गल्लीत रस्त्यावर झुंडी तयार होतात. वृध्दांच्या अंगावर धावुन येतात. नागरिकांचे व लहान बालकांचे लचके तोडतात. सायकलस्वार व दुचाकी चालवणाऱ्यांच्या मागे लागतात. त्यामुळे अपघात होऊन मनुष्याची जिवित हानी पण होते. मात्र याची परवा हे विना परवाना कुत्री पाळणारे करत नाहीत. त्यामुळे विनापरवाना कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शहरातील रस्त्यांवर वॉशिंग सेंटर, छोट छोटी दुकाने, टपऱ्या, गॅरेज वाले, हॉटेलवाले, यानी ही विनापरवाना कुत्री पाळलेली असतात, ती दिवस रात्र त्या ठिकाणी असतात व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावुन जातात. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे लागतात त्यामुळे अपघात होतात व यात बऱ्याचदा दुचाकीस्वाराला अपघातामुळे गंभीर दुखापत होउन त्यात त्याचा जीव पण जात आहे.
तरी हे लोक कुत्र्यांची योग्य निगा राखत नाहित त्यांचे लसीकरण करत नाहीत त्यामुळे अशा विना परवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही नम्र विनंती, यामुळे हे विनापरवाणे कुत्री पाळणारे नागरिक महानगरपालिकेचा कुत्री पाळण्यांचा परवाना घेतील व कुत्र्यांची योग्य ती काळजी घेतील व वेळोवेळी त्याचे लसीकरण करतील. तसेच त्यांचा त्रास इतर नागरिकांना होणार नाही.
तरी सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आयुक्त साहेब आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असे पत्रात म्हटले आहे.