तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
“कलाकाराला वय असते परंतु कलेला वय नसते. ती चिरंजीव असते. समाजाच्या निकोप वाढीसाठी, स्वास्थ्यासाठी कलांची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कलाकारांचे अत्यंत महत्त्व आहे. आपण फक्त रंगभूमीवरील कलावंतांना पहातो व त्यांनाच मान देतो. तथापि पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकाराचे महत्त्व सुद्धा तेवढेच असून त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. साहित्यिक , कलाकार यांचे त्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या सर्वांना पुरेसे मानधन राज्य शासनाने द्यावे यासाठी मी प्रयत्न करेन”. अशी खात्री मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रीक्रिएशन हॉलमध्ये अ.भा. मराठी नाट्य परिषद मावळ शाखा तसेच साप्ताहिक अंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्यामध्ये दि.१२ जानेवारी २०२५ रोजी उदघाटनपर भाषणात ते बोलत होते.
आ. सुनील शेळके पुढे म्हणाले की, तळेगावात आधुनिक नाट्यगृह असावे ही दीर्घकालीन मागणी प्रलंबित आहे. या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे खंबीर पाठपुरावा करून जे जे करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न मी निश्चित करेन.
सुरुवातीस नटराजपूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी व्यासपीठावर मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद मावळ अध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबा पाटील, कलावंत मानधन समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस मावळचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, नाट्यपरिषद कार्याध्यक्ष गणेश काकडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, रंग कर्मी विश्वास देशपांडे, प्रकल्प प्रमुख राजेश बारणे,अंबरचे सह. संपादक अतुल पवार, संजय वाडेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, तळेगावातील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम होत असतात. तसाच विचार केला तर तळेगाव ही पुणे जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानीच म्हणावी लागेल.
प्रास्ताविक करताना नाट्य परिषदेचे विश्वस्त सुरेश साखवळकर म्हणाले की, नाट्य परिषदेला अपेक्षित असणारे उपक्रम तळेगावात सातत्याने चालू असतात. साहित्य व कलाक्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या गुणीजनांची दखल घेण्याचे महत्त्वाचे काम या मेळाव्याद्वारे केले जात आहे.
स्वागतपर भाषणात नगरपरिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे म्हणाले की, वृद्ध कलाकार, साहित्यिक यांच्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून त्या सर्वांपर्यंत पोहोचायला हव्यात यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यावेळी गणेश खांडगे, बाबा पाटील, कौस्तुभ कुलकर्णी यांची भाषणे झाली. राजेश बारणे यांनी आभार प्रदर्शन केले. मावळातून सुमारे २०० साहित्यिक व कलाकार या मेळाव्यास उपस्थित होते. प्रा. अशोक जाधव, डॉ.मिलिंद निकम यांनी सूत्रसंचलन केले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी नाट्यपरिषदेचे भूषण गायकवाड, नयनाताई डोळस, संजय वाडेकर, स्वानंद आगाशे, तानाजी मराठे, संकेत खळदे, नितीन शहा, मंजूश्री बारणे यांनी परिश्रम घेतले.