
भूम : प्रतिनिधी

ग्रामस्वराज फाउंडेशन, वाल्हा यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाल्हा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ प्रकाशित “प्रश्नमंजुषा” पुस्तकाच्या आधारे घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या परीक्षेत प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक प्रदान करून गौरवण्यात येईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि शिक्षणप्रती त्यांची जिज्ञासा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामध्ये ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची सवय लावावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे या सर्व स्तरांवर ग्रामस्वराज फाउंडेशनच्या शिलेदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाचे सहकार्य लाभले. परीक्षेतील प्रश्नांच्या दर्जेदार निर्मितीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य अभ्याससामग्री देण्यासाठी संघाने विशेष योगदान दिले. यामुळे विद्यार्थ्यांना समतोल आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या परीक्षेच्या आयोजनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाल्हा चे मुख्याध्यापक श्री. भोरे सर आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परीक्षेची शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडले.या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
परीक्षेच्या माध्यमातून त्यांना नवे ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली, स्पर्धात्मक परीक्षांची सवय लागली आणि अभ्यासाच्या नव्या पद्धती आत्मसात करता आल्या. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सर्व शिलेदारांचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार. संस्थेच्या नव्या पिढीला दिशा देण्याच्या कार्यास सलाम! भविष्यातही असेच शैक्षणिक उपक्रम सुरू राहोत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.