

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांची पाहणी
पिंपरी : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देखील शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मंगळवारी (२५ फेब्रुवारी) महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सर्व रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छता मोहीम यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर यांच्यासह संबंधित रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व रुग्णालयातील सेवासुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असून, तसेच या ठिकाणी अंतर्गत स्वच्छता मोहिमेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी विविध दवाखान्यांची आणि रुग्णालयात पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयांतील उपकरणे, बेड्स, फर्निचर व स्वच्छतागृहांची स्थिती यासोबतच ओपीडी सेवांचा दर्जा आणि व्यवस्थापन याची पाहणी केली. उपस्थित रुग्णांसोबत चर्चा करून रुग्णालयातील सोयीसुविधांविषयी त्यांचे अभिप्राय जाणून घेतले. तसेच अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट आणि कागदपत्रांची योग्य ठेवण याबाबत विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सर्व दवाखाने व रुग्णालय इमारतींमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पिंपरी- वाघेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्याला भेट देत त्यांनी तेथील स्वच्छतागृहे आणि इतर सुविधांची पाहणी केली. यासोबतच कासारवाडी येथील दवाखान्याला देखील भेट देत त्यांनी रुग्ण सेवा सुधारणा, दवाखान्याची अंतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आणि स्वच्छतागृहांची स्थिती यावर लक्ष केंद्रित केले. तसेच स्टोअर रूम व जंक मटेरिअल रूमच्या व्यवस्थापनाची तपासणी करून आवश्यक सूचना दिल्या.
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे अनुषंगाने दवाखाने व रुग्णालयातील अंतर्गत कार्यालयीन सुधारणा करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी विभागांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. रुग्णांना उत्तम सेवा आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका