
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे. महापालिका प्रशासन हा कर “जिझिया कर” वसुलीप्रमाणे जबरदस्तीने वसुली करत आहे. मालमत्ता कर थकल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात व्याज लावले आहे. त्यामुळे मालमत्ता करावरील व्याज माफीसाठी एखादी नवीन योजना राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद वरखडे यांनी शेखर सिंह आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीमुळे गोरगरीब कामगार व नागरिकांना मोठा आर्थिक धक्का बसलेला आहे. त्यामुळे नागरिकांचा मालमत्ता कर थकला आहे. ही वस्तुस्थिती आहे. कोरोना महामारीतून आता कुठे नागरिक सावरत आहेत, मात्र महापालिका प्रशासन मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरेक करत आहे. तसेच अनेक नागरिक कर भरण्यासाठी तयार आहेत, मात्र कर आणि व्याज भरणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांचा विचार करून महापालिकेने व्याज माफ करण्यासाठी एखादी नवीन योजना राबविण्यात यावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.