Spread the love

विलास लांडे शहर समन्वयक, तर विजय लोखंडे कार्याध्यक्षपदी नियुक्त

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील संघटन अधिक बळकट करून आगामी 2025-26 महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभावी तयारी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आखणी व समन्वय यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनाची पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी आमदार विलास लांडे यांच्यावर शहर समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थानिक प्रश्न, निवडणुकीचे नियोजन आणि पक्षविचारांची तळागाळात रुजवण या सर्व कामांसाठी लांडे हे आता प्रमुख सूत्रधार ठरणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांना शहर कार्याध्यक्ष या पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षविस्तार, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि संघटनात्मक बळकटी यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे.

शहराध्यक्ष योगेश बहल यांनी या नियुक्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,
“मा. अजितदादा पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लांडे आणि लोखंडे यांच्याकडून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. आगामी निवडणुकांत पक्षाचे बळ वाढविण्यासाठी हे दोन्ही नेते निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या या दोन नियुक्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक समीकरणांना नवी गती मिळणार असून निवडणूक तयारीला मोठा वेग येणार, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *