
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

“शिक्षक हा आपल्या आचार, विचार आणि कार्यपद्धतीद्वारे समाज घडवण्याचे काम करतो. ध्येयवादी शिक्षकांची पिढी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांचे कार्य पुढील पिढीने नेटाने पुढे न्यावे. सामाजिक भावनेने शिक्षण देत गरीब मुलांना आधार देत मदत मिळवून देणाऱ्या तसेच इंग्रजी भाषा विषयात संस्थेचा नावलौकिक निर्माण करणाऱ्या जयश्री घावटे यांचा वारसा चालवावा.” असे गौरवोद्गार नवनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. गोविंदराव दाभाडे यांनी काढले. पर्यवेक्षिका जयश्री घावटे यांना बत्तीस वर्षाच्या अखंड सेवेनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. दाभाडे बोलत होते. सरस्वती पूजन करून ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सौ. घावटे इंग्रजी विषय शिकवत असताना त्या विषयात स्वप्नाली केवळे ही विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यात त्या विषयात प्रथम आली होती. गोरगरीब विदयार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे, इंग्रजी नाटिका बसवणे, पिंपरी चिंचवड इंग्रजी शिक्षक मंच च्या माध्यमातून समन्वय करणे, शालेय आणि शाळाबाह्य उपक्रमांचे आयोजन करणे आदी उपक्रमांच्या मुळे त्या विद्यार्थिप्रिय शिक्षिका होत्या. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक ,लातूर येथील विविध संस्थांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
विविध वक्त्यांनी सौ जयश्री घावटे यांच्या सहकाऱ्यांशी जुळवून घेत आत्मीयता जोपासत विद्यार्थीनिष्ठ कार्यपद्धतीचा व अध्यापन कौशल्याचा आवर्जून उल्लेख केला. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी धैर्याने सामना करून त्यांना उत्तरायुष्य आरोग्यपूर्ण लाभावे अशा शुभकामना दिल्या. अध्यक्ष स्थानी संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे होते.
या प्रसंगी रोटरी क्लबच्या दर्शना कामत, व्याख्याते राजेंद्र घावटे, संगीता गुरव, विजय बच्चे, राजेश माळे, हेमंत अभोनकर, प्रदीप काळोंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सविता पाटील, धैर्यशील लावंड, राजेंद्र घावटे मनोगत व्यक्त केले. जयश्री घावटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सरस्वती प्राथमिक – माध्यमिक- उच्चमाध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, आदी च्या वतीने सन्मान करण्यात आला. आजी माजी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रास्ताविक संगीता भोळे यांनी केले. सूत्रसंचालन सरिता खेनट यांनी केले. आभार प्रदर्शन अर्चना बुधकर यांनी केले.