Spread the love

वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. वारकऱ्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी सर्व यंत्रणांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

पिंपरी चिंचवड शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आगमन होणार असून यादिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये २० जूनै रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्याच्या स्वागताची महापालिकेकडून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी आयुक्त सिंह यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित ठिकाणांची पाहणी करून आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, नगर रचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप माणिकबुवा मोरे, हभप जगन्नाथ पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रमोद कुटे, गुलाब कुटे, दयानंद शेवाळे, रविंद्र जाधव, अशोक वाळुंज, सौरभ शिंदे, दत्ता चिंचवडे, महाराष्ट्र वारकरी महामंडळ सचिव आप्पा बागल आदी उपस्थित होते.

पालखी विसाव्याच्या ठिकाणाची पाहणी करून आयुक्त सिंह यांनी तेथे असलेल्या सोयीसुविधांची सविस्तर माहिती घेतली. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुक्कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात यावा. पालखी विसाव्याच्या व मार्गा ठिकाणी साफसफाई करण्यात यावी. पावसाचे पाणी कुठेही तुंबणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *