
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद सेवकांची सहकारी पतपेढी संस्था यांची वार्षिक सर्व साधारण सभा (दि . १३) जून रोजी नगर परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कर अधिकारी कल्याणी लाडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य नगर परिषद / नगर पंचायत आणि संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय भोंडवे हे होते.
यावेळी सचिव रोहित भोसले यांनी संस्थेचा ताळेबंद, नफा-तोटा आणि अहवालाचे वाचन केले. गेल्यावर्षी संस्थेने १ कोटीची उलाढाल केलेली आहे तर कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता फक्त संस्थेच्या भाग भांडवलवरच आपल्या सभासदांना कर्ज वाटप करीत आहे. यावर्षी संस्थेने आपल्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. तसेच ज्या सभासदांचे पाल्य चांगल्या गुणांनी दहावी आणि बारावी पास झालेले आहेत त्यांना प्रोत्साहन निधी जाहीर करण्यात आला. अध्यक्षीय भाषणामध्ये कल्याणी लाडे यांनी कमी सभासद असूनसुद्धा संस्था मोठी उलाढाल होत असल्याबद्दल संचालकांचे कौतुक केले तर प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस विजय भोंडवे यांनी १९६६ साली स्थापन झालेल्या या सर्वात जुन्या संस्थेची वाटचाल नवीन पिढी बिनविरोध निवडणूक करून जोमाने चालवीत असल्याने राज्यातील इतर नगर पालिका आणि नगर पंचायती यांनी या संस्थेचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले.
उपाध्यक्ष पद रिक्त झालेल्या ठिकाणी अरविंद पुंड यांची तर महिला संचालक म्हणून ज्योती वाघेला यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. सभेच्या अध्यक्ष कल्याणी लाडे यांचा सत्कार सचिव रोहित भोसले यांनी केला तर प्रमुख पाहुणे विजय भोंडवे यांचा सत्कार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम तेजी यांनी केला.
यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषद कर्मचारी संघटना शाखेच्या नूतन कार्यकारिणीच्या नवीन नामफलकाचे अनावरण प्रदेश सरचिटणीस विजय भोंडवे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार प्रवीण माने यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रवीण शिंदे, अर्चना काळे, अश्विनी गरुड, अरविंद पुंड, आशिष दर्शले, मयूर ढिलोड, वैशाली आडकर आणि सर्व सभासद उपस्थित होते.
About The Author

