Spread the love

वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास होणार मदत : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूककोंडी सोडवण्यात, सार्वजनिक वाहतुकव्यवस्था सुधारण्यात, पुणे व परिसराच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून पुण्यातील विकासप्रकल्पांसंदर्भात सातत्याने बैठका, आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारीत कामांना मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वणाज ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. आज मंजूरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) ही दोन कामे मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गिका उन्नत आणि 12.75 किलोमीटर लांबीच्या आहेत. या मार्गिकांवर 13 स्थानके असणार आहेत. या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी, वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे. पुण्यातील आयटी, व्यापारी, औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. यासाठी 3 हजार 626 कोटी 24 लाख रुपये (रु.3626.74) खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आजही (ता.25) त्यांनी ‘पीएमयु’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
—-००००—

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *