Spread the love

प्रामाणिक रिक्षाचालकांचा RTO कडून गौरव; महिला रिक्षाचालक ठरल्या प्रेरणादायी चेहरा

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

“रिक्षा चालवणारे हात म्हणजे केवळ गाडी हाकणारे हात नाहीत, तर ते समाजाला चालना देणारे हात आहेत!” – अशाच भावनेने पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला पहिला ‘चालक दिवस’ अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने अल्पाइन हॉटेल, पिंपरी येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात प्रामाणिक रिक्षाचालकांना RTO कडून अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कष्टाची गाडी चालवत असतानाही प्रवाशांनी विसरलेल्या सोने, रोख रक्कम, मोबाईल, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या चालकांचा या ठिकाणी सन्मान झाला. अंगद मुंगळे, तुकाराम देवरे, पप्पू वाल्मिकी, सोमनाथ शिंदे, सुखदेव लष्करे, महादेव बोराडे, माणिक निकम, वैभव पांचाळ यांच्यासह १७ चालकांना गौरवण्यात आले.

 

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला रिक्षाचालकांचा विशेष सन्मान. आव्हानांना तोंड देत आत्मनिर्भरतेने रिक्षा चालवणाऱ्या श्रीमती यमुना काटकर, जयश्री मोरे आणि सरस्वती गुजर यांचा सत्कार झाल्यावर सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. “या महिला समाजासाठी प्रेरणास्थान आहेत,” अशी प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली.

 

या भव्य सोहळ्याला डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित राहिले. सभागृहात “जय रिक्षावाला!”च्या घोषणा घुमत होत्या.

पहिल्याच वर्षी इतक्या भव्य स्वरूपात झालेल्या या ‘चालक दिवसाने’ रिक्षाचालकांच्या कष्टाला आणि प्रामाणिकतेला खरी दाद मिळाली.

 

“हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही, तर आपल्यावर असलेल्या विश्वासाचा आणि प्रामाणिकतेचा उत्सव आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी समाजात आदर्श निर्माण केला आहे. हा क्षण आपला सन्मान आणि एकतेचे प्रतीक आहे.”

– बाबा कांबळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत

 

“चालकांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकाच्या पाठीशी सरकार आणि समाज उभा आहे.”

-पवन नलावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *