Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत नागरिकांना चालू वर्षाचा मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन भरून थेट ४ टक्क्यांची सवलत मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सवलतीसाठी आता केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, उशीर करणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के विलंब दंडाचा भार सहन करावा लागणार आहे.

कर संकलनात ५९५ कोटींचा टप्पा

१ एप्रिल ते २२ सप्टेंबरदरम्यान महापालिकेच्या तिजोरीत ५९५ कोटी २४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. शहरातील ७ लाख २६ हजार मालमत्तांपैकी ४ लाख ६१ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये ३ लाख ८० हजारांपेक्षा जास्त करदात्यांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे.

 

नागरिकांसाठी उपलब्ध सोयी

महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमध्ये कर वसुलीची सोय करण्यात आली असून, ऑनलाइन व मोबाईल अॅपद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घरबसल्या सोयीस्कर पद्धतीने कर भरून वेळेत जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

थकबाकीदारांवर कठोर कारवाई

२५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांविरोधात महापालिका लवकरच कडक कारवाईला सुरुवात करणार आहे. यामध्ये वाहन जप्त करणे, नळ कनेक्शन तोडणे, तसेच थकीत बिगर निवासी मालमत्ता जप्त करण्यासारखी पावले उचलली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

“नागरिकांनी जबाबदारीने कर भरावा”

महापालिकेच्या महसुलाचा मोठा हिस्सा मालमत्ता करातून येतो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहरातील विकासकामांना गती मिळेल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. “३० सप्टेंबरपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्या व शहराच्या प्रगतीत आपला वाटा उचला,” असे आवाहन त्यांनी केले.

 

“कर वेळेत भरल्याने केवळ सवलत मिळत नाही, तर विकासकामांना चालना मिळते. नागरिकांनी ही संधी गमावू नये,” असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनीही सांगितले.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *