Spread the love

FSSAI–मनपा कार्यशाळेत गोंधळ; महिलांचा तीव्र निषेध

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
फेरीवाल्यांसाठी स्वच्छता व खाद्यसुरक्षा याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली कार्यशाळा आज गोंधळाच्या छायेत पार पडली. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत “लायसन्स व प्रमाणपत्र मिळणार” असे खोटे सांगून फेरीवाल्यांना दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संतप्त महिलांनी आणि फेरीवाल्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली.

कार्यशाळेचा उद्देश शहरातील वडापाव, चहा, पावभाजी यांसारख्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता नियम, FSSAI मानके आणि सुरक्षित अन्न पुरवण्याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. कार्यक्रमाला FSSAI च्या सहाय्यक संचालिका जाती हरणे, तांत्रिक अधिकारी आरशाला पाटील, विभागीय व्यवस्थापक शशांक पांडे, पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, मनपा फेरीवाला समिती सदस्या सौ. आशा कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मात्र, कार्यशाळेला मोठी गर्दी खेचण्यासाठी काही आयोजकांनी “इथे लायसन्स आणि प्रमाणपत्र मिळणार आहे” अशी खोटी माहिती पसरवली, असा संतप्त फेरीवाल्यांचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर शासकीय कार्यक्रम असूनही काही व्यक्तींनी स्वतःचे बॅनर लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तापले.

फसवणुकीच्या या प्रकारामुळे कष्टकरी महिला आणि पुरुष फेरीवाल्यांमध्ये संताप उसळला. “प्रशिक्षणासाठी यायचं आहे असं सांगितलं असतं तर आम्ही आमच्या सोयीनुसार आलो असतो. पण लायसन्सचे आमिष दाखवून आमची फसवणूक झाली,” अशी तक्रार त्यांनी केली. सभागृहात “जाहीर निषेध! जाहीर निषेध!” अशा घोषणा देत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 “रस्त्यावरील विक्रेता हा शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. त्याला सन्मान आणि प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मात्र चुकीची माहिती पसरवून झालेला हा प्रकार निषेधार्ह आहे.”
– डॉ. बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी पथारी हातगाडी पंचायत

 

 “ही सरळसरळ फेरीवाल्यांची फसवणूक आहे. जबाबदारांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.”
– बळीराम काकडे, कार्याध्यक्ष, टपरी पथारी हातगाडी पंचायत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *