शेकडो पणत्यांच्या प्रकाशात ‘शिवमय’ वातावरण; शिवभक्तांची मोठी उपस्थिती
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अत्यंत भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभा खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर दीपवंदना करण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवचरित्राचा गौरव करण्यात आला. लोहगड-विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर परिसरात दीपवंदना करण्यात आली. गड परिसरात सर्वत्र भगवे ध्वज फडकवून वातावरण अधिकच प्रेरणादायी करण्यात आले.
शेकडो पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण रायगड परिसर उजळून निघाला होता. प्रत्येक ठिकाणी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी गड दुमदुमला होता. मावळ तालुक्यासह विविध भागांतून आलेल्या असंख्य शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केले. त्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आणि कार्यवाह सुधीर थोरात यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश सोनपावले, सागर कुंभार, अमोल गोरे, बसप्पा भंडारी, सागर दळवी, गणेश भोसले, अनिकेत घरदाळे, सिद्धेश जाधव आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी रायगडावर येऊन अभिवादन करण्याची परंपरा आम्ही जपतो. या पवित्र स्थळी येऊन शिवकार्याची प्रेरणा मिळते आणि तीच ऊर्जा पुढील समाजकार्यासाठी उपयोगी पडते.”
एकूणच, शिवपुण्यतिथीचा हा सोहळा केवळ स्मरणदिन न राहता प्रेरणादायी आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
About The Author

