Spread the love

नागरिकांच्या मागणीला मान; हिंदीऐवजी मराठीतून जनजागृतीचा नवा उपक्रम

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेने स्वच्छतेच्या जनजागृतीत एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद बदल केला असून, शहरातील घंटागाड्यांवरून दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश आता मराठी भाषेतून दिला जाणार आहे. यापूर्वी हिंदी भाषेतून होणाऱ्या या ध्वनीप्रसारणाला पर्याय म्हणून नागरिकांच्या मागणीचा आदर करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि आरोग्य समितीचे सभापती निखिल भगत यांनी याबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनीही या निर्णयाला हिरवा कंदील दाखवत उपक्रमाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असताना सार्वजनिक सेवांमध्ये हिंदीचा वापर होत असल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करताना मातृभाषेचा वापर व्हावा, अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने हा सकारात्मक निर्णय घेतल्याचे सभापती निखिल भगत यांनी स्पष्ट केले.

घंटागाड्यांवरून आता “माझा कचरा, माझी जबाबदारी” यांसारख्या मराठी गीतांच्या माध्यमातून नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक केले जात आहे. या नव्या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्वच्छतेबाबत जनजागृती अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील हे स्वच्छतेबाबत आग्रही भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पंढरपूरच्या आषाढी वारीतील ‘निर्मल वारी’ उपक्रमाचे ते संयोजक असून, गाडगे महाराज जयंतीदिनी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून गौरविण्याचे आवाहन केले होते.

तसेच शहरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत स्वच्छतेबाबत शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. या सर्व उपक्रमांमुळे नगराध्यक्षांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून, मराठी भाषेतून सुरू झालेल्या या जनजागृती मोहिमेचेही सर्वत्र स्वागत केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *