गोरक्षण आणि हिंदुत्वनिष्ठ भूमिकेची दखल; १८ ऑक्टोबरला पंढरपुरात चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते होणार सन्मान
पिंपरी-चिंचवड / पंढरपूर । प्रतिनिधी
हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करत गोरक्षण आणि हिंदुत्वाशी संबंधित विविध विषयांवर ठाम भूमिका मांडणारे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना यंदाचा ‘क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक आणि हिंदुत्वविषयक कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या पुतळ्याजवळ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि उपस्थित साधुसंतांच्या हस्ते आमदार लांडगे यांचा गौरव करण्यात येणार आहे. मानाचे महावस्त्र, कुंडलिनी-कृपाणांकित भगवा ध्वज आणि ११ हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदुत्वविषयक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. स्वातंत्र्यलढा, गोवामुक्ती आंदोलन आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदानामुळे बडवे यांचे नाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर, भालजी पेंढारकर, सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याशीही त्यांचा सहवास होता, अशी माहिती आयोजकांनी दिली.
पंढरपूरमधील सामाजिक आणि तालीम क्षेत्रातील कार्याबरोबरच १९५६ मधील महापुराच्या काळात त्यांनी केलेल्या बचावकार्याचीही आठवण या निमित्ताने जागवली जाते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
आमदार महेश लांडगे यांनी गोरक्षण आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर सार्वजनिक जीवनात तसेच विधानसभेत मांडलेल्या भूमिका पुरस्कार निवडीसाठी विचारात घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी त्यांनी सुरू ठेवलेले प्रयत्न आणि स्मारकाच्या निमित्ताने आयोजित ढोल-ताशा मानवंदना सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
यापूर्वी मिलिंद एकबोटे, शिवशंकर स्वामी, धनंजय देसाई, अभय वर्तक, संजीव पुनाळेकर, प्रमोद मुतालिक आणि कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार अभिमानाचा आणि जबाबदारी वाढविणारा क्षण आहे. राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि हिंदुत्वनिष्ठेचा त्यांचा वारसा प्रेरणादायी आहे. हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा आणि विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेत गोरक्षण, संस्कृतीचे जतन आणि जनसेवेसाठी अधिक निर्धाराने कार्य करत राहीन, असे त्यांनी सांगितले.
क्रांतिवीर वसंतदादा बडवे स्मारक मंडळाचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी-इचगावकर, पत्रकार व माजी नगरसेवक महेश खिस्ते, विवेक बेणारे आणि शहर हिंदू महासभेचे अध्यक्ष विकास मोरे यांनी नागरिकांना या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
About The Author


