संसर्गग्रस्त रुग्णांची धावपळ थांबणार का? उपचारांतील विलंब टाळण्यासाठी आयुक्तांना निवेदन; सुविधा तातडीने सुरू करण्याचा आग्रह
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) संसर्गजन्य जखमा असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या सुविधेअभावी रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारांसाठी जावे लागत असल्याने त्यांची होणारी गैरसोय थांबवावी आणि महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून, आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसह सुविधा कार्यान्वित करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता, महापालिकेच्या रुग्णालयांमधील उपचार सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी वायसीएम रुग्णालय हे महत्त्वाचे आरोग्यकेंद्र आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या जखमा आणि संसर्गाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे लांडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
संसर्गग्रस्त जखमा, पूयुक्त जखमा तसेच शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर उपलब्ध नसल्यास उपचारांचे नियोजन करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवावे लागल्यास त्यांच्या नातेवाइकांना प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक तणाव सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते.
स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उपलब्ध झाल्यास संबंधित रुग्णांना वायसीएममध्येच आवश्यक उपचार देण्यास मदत होईल. त्याचबरोबर संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेणे आणि इतर रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अधिक सुलभ होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी आवश्यक जागा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर व इतर कर्मचारी आणि निधी यांची उपलब्धता तपासण्याची मागणी लांडगे यांनी केली आहे. संबंधित प्रस्तावाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन कामाला गती द्यावी. राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असल्यास त्यासाठीही तातडीने पाठपुरावा करावा, असे त्यांनी सुचवले आहे.
ही सुविधा सुरू होईपर्यंत संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारांत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये. वायसीएम हे सर्वसामान्य नागरिकांचे आधारस्थान आहे. स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर सुरू करून रुग्णांना वेळेत आणि सुरक्षित उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने निधी, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करावी. या सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा करू,” अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
आता या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते आणि स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे लक्ष लागले आहे.
About The Author


