३५ स्टॉल्ससह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची मेजवानी
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
जगभरातील नागरिकांच्या मनात आजही कुतूहल निर्माण करणारे टायटॅनिक जहाज आता पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. रावेत येथील मुकाई चौकात टायटॅनिक जहाजाच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शन साकारण्यात आले असून, या अनोख्या प्रदर्शनाचे ७ ऑक्टोबर रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले. इतिहासाची माहिती, ज्ञानाची ओढ, मनोरंजन आणि खरेदीचा आनंद अशा विविध गोष्टींचा संगम असलेले हे प्रदर्शन नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
टायटॅनिक जहाज म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो समुद्राच्या अथांग पाण्यात झालेला भीषण अपघात आणि त्याची जगभर गाजलेली कहाणी. या घटनेवर आधारित चित्रपटानेही प्रेक्षकांच्या मनावर मोठी छाप पाडली. मात्र, या जहाजाची निर्मिती, त्याचा इतिहास, पहिली समुद्रसफर आणि त्या काळातील परिस्थिती याविषयी अनेकांना सविस्तर माहिती नाही. हीच उत्सुकता लक्षात घेऊन डी. जे. ॲम्युजमेंट कंपनीने पिंपरी-चिंचवडमध्ये टायटॅनिकच्या संकल्पनेवर आधारित देखावा उभारला आहे.
जहाजाचा इतिहास जाणून घेण्याची संधी
या प्रदर्शनात टायटॅनिक जहाजाची रचना आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक माहिती जाणून घेता येणार आहे. जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली, बांधकाम कधी सुरू झाले, ते कधी पूर्ण झाले, त्याची पहिली सफर कधी झाली, जहाजाचे मालक कोण होते आणि त्याचा कॅप्टन कोण होता, अशा विविध प्रश्नांची उत्तरे प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर इतिहासाची ओळख करून देणारा ज्ञानवर्धक अनुभवही नागरिकांना घेता येईल.
विशेषतः लहान मुलांमध्ये ऐतिहासिक घटनांविषयी कुतूहल निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष जहाजाच्या वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळत असल्याने मुलांसह पालकांसाठीही ही भेट संस्मरणीय ठरू शकते.
३५ स्टॉल्समधून खरेदीचीही संधी
टायटॅनिकच्या देखाव्याबरोबरच प्रदर्शनात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुमारे ३५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हँडलूम, हँडीक्राफ्ट, विविध प्रकारची खेळणी, पुस्तके आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा समावेश आहे. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचाही आनंद लुटता येणार आहे.
याशिवाय लहान मुले आणि मोठ्यांसाठी विविध प्रकारच्या राइड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हे प्रदर्शन एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.
मुकाई चौकात भव्य व्यवस्था
रावेतमधील मुकाई चौक येथे मध्यवर्ती ठिकाणी हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतिहास, मनोरंजन, खरेदी आणि खाद्यसंस्कृती यांचा एकाच ठिकाणी अनुभव घेता येणार असल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक नगरसदस्य निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, उद्योजक राम दयाळ गुप्ता, डी. जे. ॲम्युजमेंटचे सी. के. दिनेश कुमार, सी. के. जयप्रकाश आणि सुदेश कुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
About The Author


