Spread the love

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा (रविवारी, दि. 10) आकुर्डी येथे पार पडला. यावेळी युवा सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच युवा सेनेच्या विविध पदांवरील २७२ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे या मेळाव्यात वाटप करण्यात आले असल्याची माहिती युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे यांनी दिली.

 

मेळाव्यात युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव, किरण साळी ,युवासेना सचिव प.महाराष्ट्र ऋतुराज क्षीरसागर आदींनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश कदम, राज्य कार्यकारणी सदस्या शर्वरी गावंडे, युवा जिल्हा प्रमुख बापू शिंदे, धनंजय पठारे, गणेश सावंत पाटील, विशाल हुलावळे, दत्ता केदारी, प्रशांत जाधव, जिल्हा समन्वयक सागर पाचारणे, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.

 

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा झाला. यामध्ये दोन्ही मतदार संघातील युवा सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, युवासेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख माऊली जगताप, युवासेना पिंपरी-चिंचवड शहर संघटक निलेश हाके, उपशहर प्रमुख मकरंद कदम, अभिजित पाटील, चिंचवड विधानसभा प्रमुख मंदार येळवंडे, पिंपरी विधानसभा प्रमुख सागर पुंडे, विद्यापीठ व कॉलेज कक्ष पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अॅड. संकेत चवरे यांची निवड करण्यात आली. यांच्यासह दोन्ही लोकसभा मतदार संघातील 250 पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

 

महाराष्ट्रात युवा सेनेचे संघठन मजबूत केले जात आहे. तरुणांना युवा सेनेशी जोडले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून युवक, युवती युवा सेनेत येत आहेत. युवासेनेची पुढील वाटचाल, नवीन कार्यकारणीच्या जबाबदाऱ्या, पक्ष बांधणी आणि पक्षाची वाटचाल आदींबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. युवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता पिंपरी-चिंचवड शहरातील मेळाव्याने झाली. या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर येथून झाली होती. पिंपरी-चिंचवड येथील मेळाव्यासाठी सुमारे 500 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वी युवासेनेच्या नियुक्त्या वरच्या पातळीवरून होत असत. त्यामुळे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरेसे बळ मिळत नसे. मात्र आता जे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लोकांमध्ये राहून चांगले काम करत आहेत, त्यांना युवा सेनेकडून नियुक्ती दिली जात आहे. त्यामुळे पक्ष संघटना आणि पक्षाचे काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. याचा पक्ष वाढीसाठी चांगला फायदा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेऊन युवकांनी एकत्र येऊन युवासेना बळकट करावी. युवसेनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

 

युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार लोकोपयोगी निर्णय घेत आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्यासाठी विविध योजनांची माहिती पदाधिका-यांना मेळाव्यातून देण्यात आली.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *