पिंपरी / प्रतिनिधी
अनधिकृतपणे सुरु असलेल्या तळवडेतील कंपनीत दुर्घटना होऊन सहा पेक्षा अधिक महिला कामगारांना दुर्देवी मृत्यूला सामोरे जावे लागले. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे यांनी केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
आशा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, तळवडे येथे फटाक्याच्या कंपनीमध्ये आगीची दुर्घटना होऊन या मध्ये सहा महिला कामगारांचा मृत्यू झाला. उपचारा दरम्यान आणखी दोघांना दुर्देवी मृत्यूला सामोरे जावे लागले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. योग्य सुरक्षा साधनांअभावी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सातत्याने महिला कामगारांना दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अशा प्रकारचे संकटे अनेक वेळा निर्माण होऊन त्यामध्ये महिलांचा मृत्यू होत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे प्रशासन आणि शासन या बाबत गंभीर नसल्याचे दिसते. अद्यापही कोणती खबरदारी घेतलेली दिसत नाही. अजून किती महिलांचा जीव घेणार, असा संतापजनक सवाल आशा कांबळे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी आशा कांबळे यांनी केली. तसेच महिलांना सुरक्षाच्या दृष्टीने उपयोजना करण्याचीही मागणी केली.
प्रसिद्धिपत्रकावर मधुरा डांगे, रेखा भालेराव, राणे तांगडे, सरस्वती गुजर, जयश्री मोरे, या कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सही करून निषेध नोंदवला.