जागा महापालिकेकडे हस्तांतरणाची वन विभागाला मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
डुडूळगाव- मोशी येथील वनविभागाच्या जागेत भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करणे अपेक्षीत असून, त्यासाठी सदर जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत पुणे वन विभागाचे उप वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात डुडूळगाव व मोशी येथील हद्दीवर गट क्रमांक १९० व गट क्रमांक ३१६ ही राज्य शासनाच्या वन विभागाची जागा आहे. या जागेत ग्लिरीसिडीया या परदेशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. वास्तविक, त्यापूर्वी या परिसरातील डोंगरावर गवत मोठ्या प्रमाणात उगवत होते. व त्यामुळे जनावराना चारा उपलब्ध होत होता. परंतु, परदेशी वनस्पतींच्या लागवडीनंतर गवतदेखील या परिसरात कमी झाले आहे. एकूणच या परिसरातील जैवविविधता (इको सिस्टम) अस्थिर झाली आहे. त्यामुळे सदर परदेशी झाले काढून भारतीय प्रजातींची लागवड करणे आवश्यक आहे.
तसेच, शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरुकता जोपासण्यासाठी वृक्ष लागवड करुन पर्यावरण प्रेमी नागरिकांना येथे प्रवेश खुला केला पाहिजे. यासह संबंधित जागेचे संरक्षणही होणे अपेक्षीत आहे. या करिता सदर जागेवर नियोजनबद्धरित्या वड, पिंपळ, चिंच, कळस, बांबू, हिवर, खैर यांसारख्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. डुडूळगाव व मोशी येथील संबंधित जागा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे. महापालिका त्या ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरण पूरक वन/जंगल विकसित करु शकते. सध्यस्थितीला दुर्गादेवी टेकडी व पुण्यातील तळजाई टेकडी पर्यावरण संरक्षणाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात दिली आहे. त्याच धर्तीवर डुडूळगाव व मोशी येथील वनविभागाची जागा पर्यावरण संवर्धनासाठी विकसित करावी. त्याचा फायदा नागरिकांना होईल. भविष्यातील ‘ऑक्सिजन पार्क’ तयार होईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.