हळदी समारंभातून महिलांचा सन्मान ; घरकाम महिला सभेचे आयोजन
पिंपरी : प्रतिनिधी
आजच्या युगातील महिला कितीही संकटे आली तरी स्वाभिमानी आणि स्वावलंबी बाण्याने जगत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनत आहेत. त्यांचा हा लढा त्यांच्या जगण्याची प्रेरणा बनली असल्याचे प्रतिपादन घरकाम महिला सभेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा आशा कांबळे यांनी केले.
घरकाम महिला सभेच्या वतीने पिंपरीतील कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले होते. या कार्यक्रमात सफाई कामगार महिला, घरेलु कामगार महिला, विधवा, परितक्त्या आदी महिलांचा सहभाग होता. यावेळी मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होत्या.
आर्थिक कमाई करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या वेळी कष्टकरी कामगार पंचायतच्या सरचिटणीस मधुरा डांगे, महिला रिक्षा चालक अध्यक्ष सरस्वती गुजर प्रमुख उपस्थित होते. अंजली तांदळे, काजल कांबळे, जयक्षी मोरे, राणी तायडे, रेखा भालेराव, यमुना काटकर, सगुणा सविता लोंढे, आशा पठारे, संगीता कांबळे, आरती ताई, सविता मोरे, प्रिया गाडे, सुनील यंशवते आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आशा कांबळे म्हणाल्या की, संघटनेच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. महिलांना शासनाच्या पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडविणे, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोचवणे हेच संघटनेचे उद्दीष्ट असल्याचे कांबळे म्हणाल्या.