मावळ : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या उपस्थितीत कामोठे येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक झाली. देश कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. सक्षम नेतृत्व नसेल तर देशाचे भवितव्य अडचणीत येऊ शकते. देशाची सुरक्षितता व भवितव्य याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकहाती सत्ता देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
यावेळी बैठकीस संपर्क प्रमुख राजद यादव, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, भरत जाधव तसेच सुनील गोवारी, तुकाराम सरक, श्रीकांत काकडे, अतुल मोळक, शिवाजी थोरवे, प्रसाद सोनावणे, शिल्पा देशमुख, कुंदाताई गोळे, सुलक्षणा जगदाळे, संध्या पाटील, मंदा जंगले, नंदाताई कथार, त्यावेळी ज्योती पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बारणे म्हणाले की, एकहाती सत्ता आल्यानंतर नागरिकांना न्याय देणे सोपे जाते. देशात व राज्यात एकाच विचारांची सरकार असल्यास विकास कामांना गती मिळते. गेल्या दहा वर्षात पनवेल, उरण, कर्जत भागात केलेल्या ठळक विकास कामांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. या विकास कामांच्या जोरावर शिवसैनिकांनी घरोघर जाऊन जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पनवेल भागातील शास्ती कर व वाढीव कराचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर सोडवतील. मानसरोवर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा विषय, पनवेल रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, एक तासात पुणे ते पनवेल अंतर कापणारी सुपरफास्ट ट्रेन अशी कितीतरी कामे नजीकच्या भविष्यात होणार आहेत, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. पक्षाच्या नवीन पदाधिकार्यांना बारणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.