पुणे : प्रतिनिधी
काळेवाडी येथील थोपटे लॉन्स मंगल कार्यालयात शुभम गोरे आणि प्रणिता सोनके यांच्या विवाह सोहळ्यात असे आगळे-वेगळे दृष्य पहावयास मिळाले. विवाह सोहळ्यात भटजींनी मंगलाष्टकांऐवजी सर्वांना दिलेली मतदान करण्याची शपथ…वधू-वरांनी लग्नाचे फेरे घेण्यापूर्वी हातात धरलेला मतदान जनजागृतीचा संदेश आणि अक्षदा टाकण्यापूर्वी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी घेतलेली मतदान करण्याची शपथ… पिंपरी विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात उपस्थित वऱ्हाडी मंडळीने मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या लग्नसोहळ्यात विवाहविधी सुरू होण्यापूर्वी मतदान शपथेचे वाचन करण्यात आले. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,जात, वंश,समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आणि नंतर विवाहसोहळ्यास सुरूवात झाली.
यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, नोडल पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे आदी उपस्थित होते. नवविवाहीत वधूवरांनी देखील भेटीस आलेल्या सर्व नातेवाईक,पाहुणे आणि उपस्थितांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.