पिंपरी : प्रतिनिधी
मावळात महायुतीचा आवाज बुलंद आहे आणि बारणे मावळातून तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्य मिळवून लोकसभेत जाणार आहेत, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर खासदार बारणे, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, रामटेकचे खासदार कृपाल तुमने, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे, आमदार महेशदादा लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, आरपीआयच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, तसेच सदाशिव खाडे, रवींद्र भेगडे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, नाना काटे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, चंद्रकांत नखाते, शीतल शिंदे, माई ढोरे, सुरेखा जाधव, राजेश पिल्ले, प्रमोद ताम्हणकर, राज तापकीर, मोरेश्वर शेडगे, मोरेश्वर भोंडवे, काळूराम बारणे आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही गल्ली-बोळाची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे. आम्ही विकासाचे मुद्दे मांडत असताना महाविकास आघाडी मात्र गद्दार, खुद्दार, बोके, खोके या पलीकडे बोलायलाच तयार नाही. काँग्रेस बरोबर जायची वेळ येईल, तेव्हा मी हे दुकान बंद करून टाकीन, असे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या विचारांना हरताळ फासत सत्तेसाठी काँग्रेसशी हात मिळवणी करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी कायम निष्ठा ठेवली आहे. त्यामुळे ते खरे खुद्दार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत, अशी कोटी करीत भाजपचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) टीकास्त्र सोडले. मावळातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला, असा सवाल करीत उबाठाच्या दुटप्पीपणावर त्यांनी बोट ठेवले. महायुतीच्या विकासाच्या सुपरफास्ट गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन आहे. त्याला मावळची बोगी जोडण्याचे काम मतदारांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मावळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
देशाचा नेता निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे असे सांगून फडणवीस म्हणाले की, एकीकडे संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदी हा पर्याय आहे तर दुसरीकडे 24 पक्षांच्या खिचडीचा राहुल गांधी हा पर्याय आहे. महायुतीच्या विकासाच्या गाडीला नरेंद्र मोदी यांचे सुपरफास्ट इंजिन आहे. त्याला सर्व पक्षांचे आणि मतदारसंघांचे डबे जोडले जाणार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीत वेगवेगळ्या दिशेला जाणारी सगळी इंजिनेच आहेत. त्यामुळे त्यांची गाडी जागेवरच उभी आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ मोदींची कामाची पद्धत आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक घटकाला या विकासाच्या गाडीत बसायची संधी आहे. या उलट राहुल गांधी यांच्या इंजिनात फक्त सोनिया गांधी व प्रियंका गांधी, शरद पवार यांच्या इंजिनात फक्त सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनात फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, असा शेराही त्यांनी मारला.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांची व योजनांची यादी फडणवीस यांनी यावेळी सादर केली. मोदी सरकारने महिला, शेतकरी, तरुण, दिव्यांग अशा सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. देशातील पायाभूत सुविधांवर तब्बल 13 लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. भ्रष्टाचार व कराची चोरी यांना आळा घालून मोदींनी हा निधी जनतेसाठी उपलब्ध केला आहे, असे फडणवीस म्हणाले. गेल्या दहा वर्षात केलेली कामे हा केवळ ट्रेलर होता. खरा चित्रपट तर अजून बाकी आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात खूप मोठे परिवर्तन होणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.
भारताला आत्मनिर्भर बनवून एक नवा विश्वास जागृत करण्याचे काम मोदींनी केले आहे. कोविडची लस भारतातच बनवून त्यांनी तुमचे, आमचे, सर्वांचे प्राण वाचवले आहे. मॉरिशस सारख्या शंभरहून अधिक देशांना कोविडची लस पुरवून जगात भारताची वेगळी प्रतिमा निर्माण केली. आता हे सर्व देश भारताच्या पाठीशी आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय राष्ट्रवादी, मनसे, रासप असे सर्वच पक्ष बरोबर असल्यामुळे समोर कोणी उरतच नाही. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. मानापमान बाजूला ठेवून सर्वांनी सामुदायिक जबाबदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा सादर केला. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपरीत पासपोर्ट कार्यालय, क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक, त्यांचे टपाल तिकीट, मेट्रो प्रकल्प, मेट्रो मार्गाचा विस्तार, लोहमार्ग व रेल्वे स्टेशनचा विकास, नदी सुधार प्रकल्प, लोणावळा व माथेरान येथे पर्यटन स्थळ विकास, देहूरोड, रावेत, पुनावळे, वाकड ते बालेवाडी असा साडेआठ किलोमीटरचा नियोजित उड्डाणपूल, मुंबईला जाण्यासाठी अटल समुद्र सेतू, नवी मुंबई-पनवेल विमानतळ, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला पाचशे कोटींची आर्थिक मदत, तुंगी सारख्या आदिवासी पाड्यावर वीज व रस्त्याचे काम अशी अनेक कामे मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे करता आली, असे बारणे यांनी सांगितले.
अमर साबळे, शंकर जगताप, अजित गव्हाणे, अश्विनी जगताप, चंद्रकांता सोनकांबळे, सचिन चिखले, कुणाल वाव्हळकर आदींची यावेळी भाषणे झाली. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजयाचा एकमुखी निर्धार यावेळी केला.