भूम : प्रतिनिधी
परंडा भूम वाशी मतदार संघामध्ये मागील खरीप हंगामात पावसात प्रचंड प्रमाणावर खंड पडला होता. शेतक-यांनी पिक विमा भरून संरक्षीत केलेल्या सोयाबीन सहीत सर्व खरीप पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले होते. या परीस्थितीमुळे शेतक-यांना 25% अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी माझ्यासह विविध राजकीय, अराजकीय संघटनांनी मागणी केली होती आणि शासन निर्णयातील तरतुदी नुसार शेतक-यांना 25% अग्रीम विमा नुकसान भरपाई मिळाली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर पडलेला पावसाचा खंड, दुष्काळ यामुळे मतदार संघातील शेतक-याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले म्हणून त्यांना उर्वरीत 75% नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भूम परंडा वाशी मतदार संघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पिक विमा नुकसानीच्या परीगणनणेकरीता मागील 7 वर्षापैकी दुष्काळाचे 2 वर्ष वगळता उर्वरीत 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गृहीत धरून उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते. भूम परंडा वाशी जिल्हा धाराशिव मध्ये पिकाच्या ऐन वाढीच्या, फुलोरा, शेंगा व दाणे भरणेच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परीस्थिती निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट दिसून येत असल्याने त्याचा परिणाम उंबरठा उत्पादनावर देखील दिसून येत आहे. परीणामी उंबरठा उत्पन्न कमी झाल्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतक-यांचे नुकसान होऊन देखील उंबरठा उत्पन्नाच्या आधारे शेतक-यांना विमा भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
यामुळे शासन निर्णयातील नुकसानीच्या परीगणनेकरीता मागील 7 वर्षापैकी दुष्काळाचे 2 वर्ष वगळता उर्वरीत 5 वर्षाचे सरासरी उत्पन्ना ऐवजी मागील सलग 10 वर्षातील अधिक उत्पादन आलेल्या 3 वर्षाचे सरासरी उत्पादन गृहीत धरून उंबरठा उत्पादन निश्चित करणे योग्य राहील. जेणेकरून उंबरठा उत्पादनात वाढ होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतक-यांना अधिकची विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी फायदा होईल. तरी या वर्षी संपूर्ण शेतक-यांचे प्रत्यक्षात जास्त नुकसान झालेले असल्याने सरसकट पेरणीपूर्वी सर्व शेतक-यांना उर्वरित 75% पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी मा आमदार मोटे यांनी केले.