Spread the love

चौसाळा बसस्थानकावर निदर्शने; नागरिकत संतापाची लाट

बीड: प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्याच्या भुमिकन्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आज चौसाळा (ता. बीड) येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील व शिवसंग्राम चे नेते तथा मराठा सेवक पांडुरंग आवारे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.

बसस्थानक चौकात झालेल्या या निदर्शनांत सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “डॉ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा” अशा घोषणांनी चौसाळा बसस्थानक परिसर दणाणून गेला.

डॉ. संपदा मुंडे (रा. कोठारबन, ह.मु. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) या फलटण येथे सेवेत असताना पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवले, तसेच “शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जातो” अशी तक्रार घरच्यांना दिली होती. त्यांनी या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही केली होती, परंतु योग्य वेळी कारवाई न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

मुंडे कुटुंबियांचा आरोप आहे की, “डॉ. संपदा ही बीड जिल्ह्याची मुलगी असल्याने तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले.” यामुळे संतापाची लाट उसळली असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या निदर्शनात शिवसंग्रामचे नेते पांडुरंग आवारे-पाटील, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष बापुराव पवार, माजी सभापती काकासाहेब जोगदंड, छत्रपती राजेशाहु महाराज विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष विवेक कुचेकर, प्रा. आबासाहेब जाधव, बळीराम राऊत, मुस्तफा पठाण, संतोष बोरखेडे, उत्तम जाधव, लिंबाजी तांदळे, पत्रकार एन. टी. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *