पिंपरी : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी योग शिबीराचे आयोजन करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेत शुक्रवारी महापालिकेच्या ८० शाळांमध्ये योग व व्यक्तिमत्त्व विकासावर कार्यशाळा घेण्यात आली. पत्राची दखल घेत विद्यार्थ्यांना योग साधनेचे धडे दिल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त व शिक्षण मंडळाच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती, स्वस्थ जीवनशैली व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर गुणवत्तापूर्ण कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी करावी यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी १५ जून रोजी आयुक्तांना पत्र दिले होते. २१ जून रोजी आतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा होत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये देखील योग व व्यक्तिमत्त्व विकासावर कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. तसेच दर आठवड्यातून एक दिवस सर्व शाळांमध्ये अशी कार्यशाळा आयोजित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची प्रशासकीय स्तरावरून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
त्यांच्या या पत्राची दखल घेत आयुक्तांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी महापालिकेच्या ८० शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग व व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या सहज योग ध्यान केंद्रातर्फे महापालिका शाळांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना योग साधनेचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी या योग शिबीराचे आयोजन केल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त आणि शिक्षण मंडळ प्रशासनाचे आभार मानले आहेत. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नियमित ध्यान, अभ्यास केल्यास त्यांची ज्ञानार्जनाची क्षमता वाढून ते आपल्या व्यक्तिगत आंतरिक ऊर्जेचा उपयोग करण्यास शिकतील. सोबतच आपण निश्चित रुपाने विद्यार्थ्यांना भारताचे सुविकसित, संतुलीत, शांतीपूर्ण, रचनात्मक व सक्रिय नागरिक घडविण्यास यशस्वी होऊ, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.