पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव यांच्या सहयोगाने आंबेगाव तालुक्यातील अवसारी येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन युवक-युवतींनी कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून करिअर घडवावे, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंत्री श्री.वळसे पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात जगात वेगाने बदल घडत आहेत. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. युवकांना नवनवीन क्षेत्र खुणावत आहे. या क्षेत्रातील बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह जाणून घेण्यासोबत महाविद्यालयीन जीवनात विविध कौशल्ये प्राप्त केल्यास जीवनात यश संपादन करता येईल.
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडे वळावे. स्वत: उद्योजक बनून इतरांना नोकरीची दारे खुली करावी. आपल्यातील क्षमता ओळखून आवडते क्षेत्र निवडावे. उपलब्ध सुविधा आणि आपल्या आवडीच्या आधारे करिअरचे नियोजन करावे. जीवनात यश संपादन करतांना देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
टाटा स्ट्राइव्हचे समन्वयक अमोल जाधव यांनी व्यक्तिमत्व विकासाबाबत माहिती देवून भावी उद्योजक बनण्यासाठी कौशल्यांवर भर देण्याचा सल्ला दिला. उद्योजक प्रवीण पंडित यांनी कार्यसंस्कृती विषयी तर रिलायन्स कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश बंदनापूरकर यांनी ‘रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी केले. घोडेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. एस. जगताप यांनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम आणि ऑन द जॉब ट्रेनिंगबाबत माहिती दिली.
शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्दचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील व हुतात्मा सहकारी बँकेचे संस्थापक वैभव नागनाथ नायकवडी आदी यावेळी उपस्थित होते.