सातारा : प्रतिनिधी
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळाची पाहणी केली. वारकऱ्यांना मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यासोबत निर्मलवारीसाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
डॉ.पुलकुंडवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील पालखी तळाची पाहणी करून पालखी मुक्कामासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त उपस्थित होते.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, वारकऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. मुक्कामाच्यादृष्टीने पिण्याचे पाणी आणि फिरत्या स्वच्छतागृहांची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होईल याकडे लक्ष द्यावे. पुणे जिल्ह्यातील पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी पालखी प्रस्थानानंतर त्वरीत स्वच्छता होत असून प्रत्येक तळावर अशीच व्यवस्था ठेवावी आणि त्यासाठी आवश्यक प्रमाणात स्वच्छता कर्मचारी नेमावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
पालखी मुक्काम, विसावा आणि पालखी मार्ग अशा सर्वच ठिकाणी स्वच्छता ठेवत ओला, सुका घनकचरा कचरा प्रक्रिया प्रकल्पांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा संकलनासाठी त्या त्या ठिकाणच्या नगरपरिषद, ग्रामपंचायतींनी आपल्या घंटागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत; अशी माहिती यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण तालुका प्रशासनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या केलेल्या नियोजनाबद्दल डॉ.पुलकुंडवार यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्ते पालखी मार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. हरितवारीसाठी लावलेल्या वृक्षांचे योग्यप्रकारे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.