कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांचा पिंपरी-चिंचवड मनपाला इशारा
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी येथील मोरवाडी चौक (अहिल्यादेवी पुतळ्यासमोर) येथे बसविलेल्या अनावश्यक व अशास्त्रीय काँक्रीट डिव्हायडरमुळे नागरिक, रिक्षाचालक आणि वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. या डिव्हायडरमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळे वाढले असून, मनपा प्रशासनावर “सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार” केल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी मनपा प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे.
“१० नोव्हेंबर रोजी मनपा मुख्यालयासमोर आम्ही अभूतपूर्व आंदोलन करू. डिव्हायडर हटवला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर मनपा प्रशासन जबाबदार राहील,” असा सणसणीत इशारा डॉ. कांबळे यांनी दिला आहे.
संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, हा डिव्हायडर कोणत्याही शास्त्रशुद्ध वाहतूक अभ्यासाशिवाय, कोणताही जनसहभाग न घेता बसविण्यात आला आहे.
यामुळे चौक अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळ-सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांना घेणे-सोडणे कठीण झाले आहे. चुकीच्या उंचीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे.
“हा डिव्हायडर म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेवरचा प्रयोग नाही, तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा प्रकल्प आहे,” असा आरोप संघटनेने केला आहे.
डॉ. कांबळे म्हणाले, “हा संपूर्ण प्रकार म्हणजे आर्थिक गैरव्यवहार आहे. जनतेच्या पैशांवर ‘सुशोभीकरण’ या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा कष्टकरी वर्गासह सर्व नागरीकांना घेऊन आम्ही मोठे आंदोलन उभे करू.”
त्यांनी पुढे सांगितले की शहराचा विकास “शास्त्रशुद्ध अभ्यास, तज्ज्ञ समिती आणि जनसहभागाशिवाय” होऊ नये, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने व घेराव आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात सर्व रिक्षा-टॅक्सी चालक, नागरिक आणि स्थानिक संघटना सहभागी होणार आहेत.
“शहराच्या शास्त्रशुद्ध विकासासाठी सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे,”
असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे मुख्य संघटक शुभम तांदळे यांनी केले आहे.
About The Author

