नवी सांगवी : प्रतिनिधी
नवी सांगवी परिसरात मागील काही आठवड्यांत चोरी, मोबाईल स्नॅचिंग, वाहनचोरी आणि तरुणांच्या टोळ्यांमधील हाणामारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरात भीतीचं सावट पसरलं असून, “आम्ही सुरक्षित आहोत का?” असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) युवासेना, मावळ लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांना निवेदन देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रात्री पोलिसांची गस्त अत्यल्प असल्यामुळे गुन्हेगारांना मोकळं मैदान मिळत आहे. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत, त्यामुळे तपास प्रक्रियेतही पोलिसांना अडचणी येत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून मेघराज लोखंडे यांनी पुढील उपाययोजनांची मागणी केली आहे.
रात्रीच्या गस्तीत मोठ्या प्रमाणात वाढ करणे.
संवेदनशील भागांमध्ये पोलीस पथके तैनात करणे.
सर्व निकामी सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करणे.
नागरिक–पोलीस संवाद वाढवण्यासाठी स्थानिक सुरक्षा समित्या पुन्हा सक्रिय करणे.
नवी सांगवीतील विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि महिला यांच्यात भीतीचं वातावरण असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाला थेट संदेश दिला आहे.
परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या वाढत्या असंतोषानंतर आता सर्वांचे लक्ष पोलिस प्रशासनाकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे लागले आहे. गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रशासन किती तत्परतेने काम करते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
About The Author

