


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
श्री गणेश मोफत वाचनालयात मंगळवारी, दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्री. अतुल पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम दाभाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय सौ. आरती म्हाळस्कर यांनी करून दिला.अतुलजी पवार यांचा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. राघवेश हब्बु, धनश्री कांबळे, श्री पद्मनाथ पुराणिक आणि श्री. हर्षल गुजर यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याची प्रशंसा करत वाचन आणि ज्ञानार्जन महत्वाचे असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे अतुल पवार यांनी सांगितले की डॉ. कलाम सामान्य घरातील विद्यार्थी होते. कठोर मेहनत आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी पुस्तकांचे वाचन आणि ज्ञानार्जनाचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, डॉ. कलाम यांनी स्वतःच्या आयुष्यात पुस्तकांचे वाचन महत्त्वाचे मानले होते आणि त्यामुळेच ते विज्ञान क्षेत्रात इतके यशस्वी झाले.समारोप करताना प्रशांत दिवेकर म्हणाले,की डॉ.अब्दुल कलाम यांच्या वाचन,अभ्यास आणि देशभक्ती या गुणांचे आपण अनुकरण करू या. भारताला महाशक्ती बनवण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा आपण सक्रिय भाग होऊ या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश कुलकणी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश कुलकणी यांनी केले. कार्यक्रम वाचनालयाच्या कै. सौ.क्षमा अरविंद शहा सभागृहात पार पडला.
श्री गणेश मोफत वाचनालयाच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. कार्यक्रमासाठी श्री गणेश मोफत वाचनालयाचे संचालक श्री प्रीतम भेगडे , श्री यतीन शहा, श्री सागर शहा, श्री ललित गोरे व कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.