पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा वारंवार होत असताना आज (दि. 26) रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये पिंपरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांची उमेदवारी घोषित केली.
पिंपरी विधानसभेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने आमदार अण्ण बनसोडे यांना या अगोदरच उमेदवार घोषित केलेले आहे. पिंपरी विधानसभेत नागरिकांमध्ये महायुतीच्या विरोधात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार तर सीमा साळवे यांची नावे पुढे केली जात होती परंतु आज मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने सुलक्षणा शीलवंत धर यांना उमेदवारी दिल्याने अनेकांचे पत्ते कट झाले.
पिंपरी विधानसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर म्हणाल्या, पक्षश्रेष्ठींनी पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड रोहितदादा पवार, डॉ.अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, धैर्यशील मोहिते, विलास लांडे, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.
येणाऱ्या काळात आपल्या सर्वांची मिळणारी साथ ही नक्कीच परिवर्तनाची नांदी ठरेल, यात शंका नाही. आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी काम करण्याची दिलेली ही संधी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जनतेची सेवा करण्याची माझी निष्ठा व त्याग यांना मान्यता मिळाल्याचे प्रतीक आहे. सर्वसामान्य जनतेच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी अथक परिश्रम घेण्यास कटिबद्ध आहे. तुम्ही टाकलेला विश्वासाचे सार्थक करण्यासाठी मी सदैव तत्पर असणार आहे असे पिंपरी विधानसभेचे उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केले.