Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जागर मानवी हक्क अभियान, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, घटनातज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी.जे. पाटील, जेष्ठ समजसेविका मेधाताई पाटकर प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दूल जाधवर, विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, डॉ. बबन जोगदंड आदी उपस्थित होते.

 

महेंद्र महाजन म्हणाले, लोकशाही टिकण्याचे महत्वाचे कारण म्हणजे संविधान. भारतीय जागतिक पटलावर आपल्या संविधानामुळे यशस्वी वाटचाल करीत आहेत. मानवाला सुरक्षितरित्या जगण्याचा अधिकार म्हणजे मानवाधिकार नव्हे. तर, आदराने व सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे मानवाधिकार आहे.

 

आज विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा का द्यावा लागत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजात पसरलेली जातीची आणि धर्माची नशा थांबविणे गरजेचे आहे. यामुळे मानवता नष्ट होत आहे. ब्रिटीश काळातील कायदे बदलण्याकरिता आमचा विरोध नाही. मात्र, संविधान, समता, न्यायाच्या दिशेने कायदे बदलणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

 

प्रा.डॉ. उल्हास बापट म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली. मात्र, केवळ भारतात लोकशाही जिवंत राहिली. पंतप्रधान जेव्हा शक्तिशाली होतात, तेव्हा लोकशाही व हक्काला धोका निर्माण होतो. जोपर्यंत नागरिक सतर्क असतील, तोपर्यंत हा धोका टाळता येईल.

 

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, न्यायव्यवस्थेतील अनेक गोष्टी सामान्य माणसाला माहीत नसतात. त्यामुळे याविषयी परस्पर संवादाचे काम सामाजिक संस्था करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी मानवाधिकार पुरस्कारार्थी म्हणून श्रीपाद शिवाजी कोंडे देशमुख (सामाजिक कार्य), शामसुंदर सोनार महाराज (सामाजिक प्रबोधन), महादेव खंडागळे (जागर रयतेचा कलापथक) तर विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कारार्थी म्हणून

संविधान संवाद समिती महाराष्ट्र, अपना वतन संस्था (पिंपरी चिंचवड पुणे), संस्कार प्रतिष्ठान (पिंपरी चिंचवड), युवक क्रांती दल संघटना (पुणे शहर), लोकायत संघटना, पुणे, सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्था – पुरंदर, श्रमिक एकता महासंघ (पिंपरी चिंचवड पुणे), संविधान परिवार लोकचळवळ इचलकरंजी कोल्हापूर( कै. राधा देशपांडे स्मृतीप्रित्यर्थ) मेरा गाव मेरी संसद. अकोला (कै. लिला अडबे स्मृतीप्रित्यर्थ विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे: अधिकार मित्र या सर्वांनाच मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कूचेकर यांनी केले तर मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *